वर्धा- महात्मा गांधींनी 1937 मध्ये वर्धा सेवाग्राममध्ये प्रस्तावित केलेल्या नई तालीममध्ये मातृ भाषेतून कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जात आहे. त्याचपद्धतीने देशाच्या 2020 मधील राष्ट्रीय शिक्षण धोरणांतही मातृभाषेला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात आल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. वर्ध्याचा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाप्रसंगी आभासी माध्यमातून संबोधित करत होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच अटलबिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्घाटन आभासी पध्दतीने केले.
University Wardha Silver Jubilee : महात्मा गांधींच्या 'नई तालीम'चे अनुकरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे प्रतिपादन - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ रौप्य महोत्सव
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वर्ध्याचा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी समारंभाप्रसंगी आभासी माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच अटलबिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाचे उद्घाटन आभासी पध्दतीतुन रिमोट दाबून केले.
भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा गौरवशाली इतिहास असून समृद्ध साहित्य आहे. आपल्या देशात भाषिक विविधता असणे हे आपले भाग्य असून आपली ताकद आहे. आपल्या भाषेतून आपली सांस्कृतिक एकता व्यक्त होते हे सुद्धा विशेषता आहे. गांधीजींच्या 'नई तालीम' चे त्यांच्या अनुभववी संशोधन आणि विद्यापीठाने केलेले राष्ट्रीय अभ्यास शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरू शकत असल्याचेही उपराष्ट्रपती म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते म्हणाले की, "डॉ. आंबेडकर जीवनभर शिक्षण आणि समतेसाठी कटीबद्ध राहिले. त्यांच्या जीवन संघर्षात शिक्षणाने त्यांना मार्गदर्शन केले." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपराष्ट्रपती म्हणाले की वर्ध्याची पवित्र भूमी महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या जीवन तत्वज्ञानाची साक्षीदार आहे. ते म्हणाले की, वर्धा हे देशाचे प्रेरणास्थान आहे. यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस ऑनलाईन तर विधानपरिषदचे सदस्य डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विद्यापीठातील अनेक मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते.