वर्धा- नुकतेच २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, आता सर्वांना निवडणुकीच्या निकालाची आतुरता लागलेली आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील ४ मतदासंघापैकी २ मतदारसंघ भाजपच्या, तर २ काँग्रेसच्या ताब्यात होते. मात्र, यंदा हिंगणघाट आणि देवळी मतदारसंघामध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. याचा फटका कोणला बसणार हे पाहावे लागेल. तसेच हिंगणघाटचा गड राखण्यात भाजपला यश मिळेल का? हेही काही तासात स्पष्ट होईल.
२०१४ च्या निवडणुकीतील स्थिती या मतदारसंघातील मागील इतिहास पाहता काँग्रेस आणि भाजप या २ पक्षात लढत पाहायला मिळाली आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अमर काळे यांनी ३ हजार मतांनी भाजपच्या दादाराव केचे यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत देखील काँग्रेसचे आमदार अमर काळे आणि भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांचा दुहेरी लढतीचा इतिहास कायम ठेवत त्यांनी निवडणूक लढवली. हे दोन्ही उमेदवार चौथ्यांदा आमने-सामने होते. आता गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली जागा भाजपचे आमदार केचे आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देवळी विधानसभा मतदारसंघ -
२०१४ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसच्या रणजीत कांबळे यांनी फक्त ९४३ मतांनी भाजप उमेदवार सुरेश वाघमारे यांचा निसटता पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे. येथून शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख रिंगणात होते, तर काँग्रेसकडून सतत ४ वेळा आमदार राहिलेले रणजीत कांबळे हे पाचव्यांदा निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेला संधी दिल्यामुळे याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा रणजीत कांबळे आपला गड राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ -
गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या समीर कुणावार यांनी ६५ हजार मतांनी बसपचे प्रलय तेलंग यांचा पराभव केला होता, तर तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादीचे राजू तिमांडे होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून समीर कुणावर हेच रिंगणात होते, तर आघाडीकडून राजू तिमांडे यांनी निवडणूक लढवली. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह होता. मात्र, विद्यमान आमदार भाजपचे असल्याने येथून समीर कुणावार यांनीच निवडणूक लढवली. त्यामुळे शिवसेनेच्या अशोक शिंदे यांनी बंडखोरी केली. आता या बंडखोरीचा फटका कोणाला बसतो? हे उद्या स्पष्टच होणार आहे.
वर्धा विधानसभा मतदारसंघ -
वर्ध्यामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजपला यश मिळाले. त्यावेळी भाजपवासी झालेले पंकज भोयर यांनी ८ हजार मतांनी काँग्रेसच्या शेखर शेंडे यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत देखील भाजपचे पंकज भोयर आणि शेखर शेंडे यांच्यासोबत थेट लढत होती. शेंडे हे तिसऱ्यांदा रिंगणात होते. मात्र, आता गेल्या निवडणुकीत भाजपने आपल्याकडे खेचलेला गड या निवडणुकीत देखील भाजप राखणार का? हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.
सध्याची स्थिती -
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ६१.७६ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा एकूण टक्का वाढला. पण चारही मतदार संघातून वर्ध्यात सर्वाधिक कमी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत एकूण ५८ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात दोन ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. हिंगणघाटमध्ये शिवसेनेने तर देवळीत भाजपने बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता या बंडखोरी आणि इतराना दोन उमेदवारांना मिळालेला पाठिंबा याचा फटका समीर कुणावर यांना बसणार का? हे उद्या स्पष्ट होणार.
तसेच देवळी मतदारसंघात देखील भाजपच्या राजेश बकाने यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता त्याचा फटका शिवसेनेचे समीर देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत हिंगणघाटवर भाजपची सत्ता होती. यंदा देखील भाजप हा आपला गड राखणार का? तसेच गेल्या निवडणुकीत फक्त २ जागांवर समाधान मानलेल्या भाजपला यंदा तीन पैकी किती जागा काबीज करता येईल? तसेच हिंगणघाट मध्ये माजी राज्यमंत्री राहिलेले शिंदे यांना नाकारून राष्ट्रवादीतून आलेले समीर देशमुख यांना तिकीट दिली खरी पण ते शिवसेनेचे खाते उघडू शकेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.