वर्धा - लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदारसंघात वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातल्या ५ तालुक्यांचा समावेश होतो. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस मोदी लाटेत स्वार झाल्याने त्यांनी २ लाख १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी काँग्रेसच्या चारूलता टोकस यांच्याशी त्यांची लढत होत आहे.
निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज अमरावती जिल्ह्यातल्या एकूण पाच तालुक्यातील ५ लाख ९९ हजार १९३ मतदार आपला हक्क वर्धा लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे. यात १०५८ दिव्यांग मतदार देखील आहेत. तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
या वर्धा लोकसभेत मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश होतो. त्या अनुषंगाने ६९५ मतदान केंद्र असणार आहे. मतदारसंघात मतदानासाठी एकूण ३ हजार ६० अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १ हजार ३३६ पोलिसांचा समावेश आहे. यात आयजीपी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक असा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. यात काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस व विद्यमान भाजपा शिवसेना युतीचे खासदार रामदास तडस या दोन प्रमुख उमेदवारात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सह दिगग्ज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. तर काँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांच्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्धेत प्रचार सभा घेतली होती.