वर्धा -शहरालगतच्या मांडवा शिवारातील टेकडीवर नर बिबट्याची निर्घृणपणे शिकार करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. यात बिबट्याचे चारही पाय आणि मुंडके कापून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतक्या निर्घृणपणे शिकार झाल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विभागाने घटनेची नोंद करत चौकशी सुरू करत शोधमोहीम सुरू केली आहे.
मांडवा शिवारात बिबट्याची निर्घृणपणे शिकार वर्ध्यापासून 14 किमी अंतरावर असलेल्या मांडवा कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या टेकडीवर बिबट्या अवयव नसलेल्या मृतावस्थेत काहींना दिसला. याची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी पोहचले. यावेळी प्राथमिक तपासणी करण्यात आली. बिबट्याचे मुंडके तसेच चारही पाय कापून नेल्याने शिकार झाली असल्याचे सांगितले जात आहे.
पाहिल्यांदाच वर्धा वनविभागाच्या परिक्षेत्रात अशाप्रकारे निर्घृणपणे शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे चौकशी करत परिसर पिंजून काढण्यात आला. चौकशी नंतर पंचनामा करत शवविच्छेदन डॉ. रेणुका दिवाळे, डॉ कल्पना गायकवाड, डॉ संजय बागल यांनी केले. लवकरच गुन्हेगारांना पकडून कारवाई केली जाईल, अशी माहिती वन्यजीव मानद कौशल मिश्रा यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
घटनास्थळी बिबट्या मिळाला तिथे रक्त न मिळाल्याने दुसरीकडे हत्या करून तिथे फेकण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलीस डॉग पाचारण करत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेत चौकशी सुरू करण्यात आली. हे काम एका व्यक्तीचे नाही. ज्या पद्धतीने अवयव कापण्यात आले तो नक्कीच सराईत असल्याचे बोलले जात आहे. पण, बिबट्याची कातडी तशीच असल्याने संशयाची सुई कुठे जाणार याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी वनविभागाच्या सहायक वनउपसरंक्षक तुषार ढमढेरे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड वन्यजीव मानद कौशल मिश्रा, क्षेत्र सहायक श्याम परडखे, उमेश शिरपूरकर, तसेच जलद पथकाचे कर्मचारी आदींनी प्रक्रिया पार पाडत बिबट्याला अग्नी दिला. पुढील तपास सुरू करण्यात आला असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.