वर्धा- राज्यातील पायाभूत निर्मितीमध्ये बांधकाम कामगारांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या घामाचे, कष्टाचे मोल त्यांना मिळाले पाहिजे. गरिबांचे पैसे खाणारी संस्कृती नष्ट करण्याचे काम शासनाने केले आहे. या गरीब कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम शासन करत असल्याचे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सांगितले.
कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. रामनगर येथील सर्कस मैदानावर 'सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा' या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत कामगारांना लाभ वाटपावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव चुं. श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे उपस्थित होते.
ऑनलाईन पद्धतीने होणार कामगारांची नोंदणी
कामगार कल्याण विभागामध्ये सुरू असलेली दलालांची साखळी तोडण्यासाठी कामगारांची नोंदणी यापुढे ऑनलाईन करण्यात येणार आहे. लवकरच याचा प्रारंभ होईल. तसेच नोंदणी किंवा योजनांचा लाभ मिळवून देतो, असे म्हणणाऱया दलालांची तक्रार थेट माझ्याकडे करावी, असे आवाहन कुटे यांनी यावेळी केले. पण सद्य स्थितीत सुरू असलेल्या नोंदणीला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करणार
महाराष्ट्रात 2007 ते 2014 पर्यंत केवळ 2 लक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी होती. 2016 पासून या नोंदणीला वेग दिला असून केवळ दोन वर्षात राज्यात 16 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. त्यातील 9 लाख कामगारांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वच कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या 29 योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वंचित कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्याचे कामगार विभागाचे ध्येय असल्याचे कुटे यांनी यावेळी सांगितले. तसेच वर्धा जिल्ह्यात 89 हजार कामगारांची नोंदणी झाली असून कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केल्या विवध मागण्या
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी देण्यात येणारी मदत 30 हजार रुपयावरुन 50 हजार करावी, कामगारांच्या पाल्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, 60 वर्षाच्या कामगाराला एकमुस्त रक्कम देण्यात यावी, एमएससीआयटी करताना प्रवेशाच्या वेळी 50 टक्के रक्कम देण्यात यावी, मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी कामगारांच्या नोंदणीसाठी समन्वयाने काम करावे आणि कामगारांसाठी कामगार भवन उभारावे, अशी मागणी यावेळी केली.
याप्रसंगी एकूण 3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या लाभाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. असेच अटल विश्वकर्मा नोंदणीसाठी उल्लेखनीय काम करणारे सरकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांचा कामगारमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याला मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची उपस्थिती होती.