वर्धा -कारंजा तालुक्यातील जऊरवाडा गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर खैरी या पुनर्वसीत गावाने बहिष्कार टाकला आहे. केवळ मतदानावर बहिष्कार टाकून हे मतदार थांबले नाहीत, तर आपल्या विविध मागण्यांसाठी या ग्रामस्थांनी चूलबंद आणि अन्नत्याग आंदोलन केले आहे. गावाचे पुनर्वन होऊ ग्रामपंचायात स्थापन झाली, ग्रामपंचायत स्थापनेपासून गावातील सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
कारंजा तालुक्यातील खैरी हे गाव धरणात गेल्याने गावाचे नव्याने पुनर्वसन करण्यात आले. 20 वर्ष उलटूनही गावात नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. गट ग्रामपंचायत असल्याने गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. खैरी ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, अखेर आपल्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
लक्ष वेधण्यासाठी चूलबंद आंदोलन
गट ग्रामपचांयतींच्या ऐवजी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, गावात पायाभूत सुविधांचा विकास करावा, अशा विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. त्याचबरोबर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने चूलबंद आंदोलन देखील करण्यात येत असल्याची माहिती लक्ष्मी कुंभरे यांनी दिली आहे.
खैरी गावाचा मतदानावर बहिष्कार जमीन देऊन आम्ही काय गुन्हा केला?
आज सिंचनसठी खैरी गावकऱ्यांनी जमीन दिली, हजारो हेक्टर शेत सिंचनाखाली आले, 35 गावाचा पाणी प्रश्न सुटला, आमचे घर दार सोडून आम्ही नवीन ठिकाणी आलो पण आम्हाला सोयी सुविधा देण्यात आल्या नाहीत. यामुळे जोपर्यंत गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याची माहिती संजय पाठे यांनी दिली आहे. दरम्यान ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने, मतदान केंद्राकडे ग्रामस्थ फिरकले नाहीत. मतदान केंद्रावर केवळ मतदान अधिकारी आणि पोलीस असल्याचे पाहायल मिळत आहे.