महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबाजी का लंगर.. लॉकडाऊन काळात गरजूंसाठी २४ तास खुला, 20 लाख वाटसरूंची शमवली भूक - गुरुद्वारा करंजी यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील करंजी गावापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारातून मागील दोन महिन्यांपासून अन्न वाटप केले जात आहे. 'करनैल सिंग खैरा' नावाचे 81 वर्षीय बाबाजी या गुरुद्वारामध्ये सेवा देत आहेत. नांदेडपासून पंजाबपर्यंत 'खैरा बाबाजी' अशीच त्यांची ओळख आहे.

khaira Babaji Lungar fed over 20 Lakh people people during Lockdown period
'खैरा बाबाजीका लंगर' माध्यमातून 20 लाख जेवणाची ताटे वाटप

By

Published : Jun 1, 2020, 11:03 PM IST

Updated : Jun 2, 2020, 8:33 PM IST

यवतमाळ/वर्धा-जिल्ह्यातील करंजी गावापासून काही अंतरावर असलेल्या गुरुद्वारातून मागील दोन महिन्यांपासून अन्न वाटप केले जात आहे. 'करनैल सिंग खैरा' नावाचे 81 वर्षांचे बाबाजी या गुरुद्वारामध्ये सेवा देत आहेत. नांदेडपासून पंजाबपर्यंत 'खैरा बाबाजी' अशीच त्यांची ओळख आहे. तेजस्वी चेहरा, स्मित हास्य आणि निस्वार्थ मानवसेवा, हाच मूलमंत्र घेऊन ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रचेच झाले. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये ते 24 तास 'गुरू का लंगर' चालवत आहेत आणि वाटसरुंची भुक भागवत आहे. आजतागायत 20 लाख अन्नाच्या ताटांचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशभरात लॉकडाऊन सुरु झाले आणि ठिकठिकाणी मजूरवर्ग अडकला. लॉकडाऊनमध्ये सर्वकाही बंद असल्याने हा गुरुद्वारा देखील बंद करण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, खैरा बाबाजींनी त्यानंतर 'गुरूचा लंगर' सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण हा गुरुद्वारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर आहे. तसेच लॉकडाऊननंतर आपापल्या गावी जाणाऱ्या लोकांना रस्त्यात खायला काहीच मिळू शकणार नव्हते. त्यामुळे एका हातात घरातील वस्तु, डोक्यावर लेकरू आणि हातात तुटलेली चप्पल घेऊन जाणाऱ्या नागरिकांसाठी खैरा बाबाजीने अन्नाचा घास द्यायला सुरुवात केली.

'खैरा बाबाजीका लंगर' माध्यमातून 20 लाख जेवणाची ताटे वाटप...

हेही वाचा...आईपासून दुरावलेले माकडाचे पिल्लू अन् हरणाच्या पाडसाची अनोखी मैत्री

खैरा बाबाजींनी हा लंगर सुरू झाल्यानंतर सकाळी चहा बिस्कीट आणि त्यानंतर जेवण देण्याचे ठरवले. अर्धा एकर परिसरात असणारा गुरुद्वारा आणि लंगर, हे सगळे काही एका पत्र्याच्या शेडखाली चालत असे. कोरोनाची भीती पाहता या शेडला बंदिस्त करुन घेण्यात आले. केवळ एक हाताने जेवण घेता आणि देता येईल, या पद्धतीने हा लंगर सुरू केला. मात्र, मजुरांचे लोंढे मोठे असल्याने अनेक अडचणी येत राहिल्या तरिही अन्न वाटप सुरुच राहिले.

येथे सेवा देणारे 17 नागरिक सकाळ आणि संध्याकाळ काम करत आहेत. 24 तास सेवा देणारे हे लंगर चालवणे, अतिशय कठीण काम आहे. मात्र, या 17 नागरिकांच्या सहकार्याच्या जोरावर खैरा बाबांनी 20 लाख ताटे म्हणजेच 20 लाख लोकांना जेवण दिले आहे. लंगर देताना लोकांचा आकडा मोजला जात नाही. परंचु ज्या ताटात जेवण दिले जाते त्यांची संख्या 15 लाखापेक्षा जास्त असून 5 लाख लोकांना घरपोच अन्न सेवा दिली आहे.

दररोज जेवणात काय बनवले जाते...

या गुरुद्वाराच्या शेडमध्ये मोठ्या भट्ट्या आणि भांड्याच्या सहाय्याने 6 क्विंटलपर्यंत भात बनवला जातो. सोबतीला कधी वांग्याची, कधी बटाट्याची भाजी, कधी कोबी, कधी इतर भाज्या असे पदार्थ बनवले जातात. धान्य देणारे देतात आणि आम्ही फक्त शिजवून खाऊ घालतो, असे खैरा बाबाजी सांगतात. यासाठी त्यांना पांढरकवड्याचे सलीम खेतानी, नरेंद्र नारलावार, पवनजीतसिंग कपूर, मनोजसिंग काले, केवलसिंग कपूर, काही वकील मित्र यांसह इतरही लोकांनी आवश्यक साहित्ये, धान्ये आणि भाजीपाला दिले असल्याचे बाबाजींनी सांगितले.

15 हजार मजुरांना दिल्या चपला...

खैरा बाबाजी यांच्या लहान भावाचा मुलगा गगनदीप सिंग यांनी देखील यात हातभार लावला आहे. गगनदीप येथे एक जनरल स्टोअर चालवतो. त्याने येथे येणाऱ्या मजुरवर्गाला जेवणासह अंग आणि कपडे धुण्यासाठी साबण दिले. पायी प्रवास करणाऱ्या 15 हजार नागरिकांना त्याने चपला दिल्या आहेत.

मुक्या प्राण्यांचीही भागवली जाते भूक...

या गुरुद्वारातून 24 तास लंगर मार्फत मानवसेवा केली जाते. मात्र, मुक्या प्राण्यांनाही पोळ्या आणि गुळ खायला दिला जातो. त्यामुळे येथे केवळ मानवसेवा नाही, तर पशुसेवा सुद्धा केली जाते.

इतका मोठा डोलारा सांभाळणारे खैरा बाबाजी आहे तरी कोण ?

बाबाजींचा, करनैल सिंग खैरा ते खैरा बाबाजी हा प्रवास मोठा आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये झाला होता. खैरा बाबाजींच्या वयाच्या 11 वर्षी त्यांचे गुरू संत जीवन सिंग आणि संत शिशासिंग यांनी खैरा बाबाजीच्या वडिलांना एक सेवा दारा म्हणून मुलगा मागितला. तेव्हापासून ते महाराष्ट्रात आले आणि तेथूनच बाबाजींचा सेवा प्रवास सुरु झाला. आज त्यांचे वय 81 असले तरिही ते गुरुद्वारामाध्यमातून सेवा देत आहेत.

Last Updated : Jun 2, 2020, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details