वर्धा- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर हे मागील साडेचार वर्षे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. त्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर बावणकुळे यांनी गुरुवारी जनता दरबार भरवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी एकाच दिवशी 600 लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर प्रश्न तात्काळ निकाली काढा अन्यथा उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळवले.
सामान्य नागरिकांना स्वतःचे प्रश्न हे सहसा थेट मंत्र्यांपुढे मांडण्याची संधी मिळत नाही. पण चंद्रशेखर बावणकुळे हे पालकमंत्री होताच त्यांनी नागरिकांची गऱ्हाणी थेट त्यांच्याकडून ऐकून घेतली. यात अनेक धक्कादायक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. सर्व सामान्य माणसाला कशाप्रकारे शासकीय यंत्रणेत इथून तिथे, आज या उद्या या असे उत्तर मिळतात हे तक्रारी ऐकून त्यांना कळले.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर -
बावणकुळे यांनी संबंधित विभागाला 15 दिवसाच्या आत नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काही कारणास्तव प्रश्न न सुटल्यास ते सुध्दा संबधित तक्रारकर्त्यास सांगा, एकच तक्रार पुन्हा परत येऊ नये, आल्यास तर त्याचे परिणाम आणि उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला द्यावे लागतील, असे त्यांनी संबधिताना खडसावले. यामुळे प्रत्येक निवेदनावर शेरा देत प्रश्न निकाली निघतील असा विश्वास तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना वाटू लागले आहे.