वर्धा -इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून तिहार तुरुंगातील एका आरोपीच्या पत्नीला सेवाग्राम जवळील म्हसाळा येथून एनआयएने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज पहाटे केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
इसिसचे वर्धा कनेक्शन; एनआयएकडून संशयित महिला ताब्यात - इसिस
एनआयए पथकाने इसिस संबंधावरून संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्याकडून काही साहित्य मिळाले.
अब्दुल बाशीद नावाच्या इसिसच्या हस्तकास २०१६ मध्ये अबुधाबी येथे अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१८ पासून तो सध्या तिहार कारागृहात बंदी असल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्यातून ताब्यात घेतलेली महिला अब्दुल बाशीदची दुसरी पत्नी आहे. शनिवारी पहाटे ती हैदराबाद येथून आईकडे आली. ती वर्ध्यात येत असल्याने एनआयए पथक तिच्या मागावर होते. पथकाने संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्याकडून काही साहित्य मिळाले. त्यानंतर तिला तिच्या आईसोबत सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिला पोलीस ठाण्यातून कुठे नेण्यात आले हे कळू शकले नाही.
पतीच्या माध्यमातून तिचा इसिससोबत संबंध आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एनआयएकडून तपासात गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे आज तिच्या चौकशीमध्ये नेमके काय घडले? हे समजू शकले नाही.
दरम्यान एनआयएने आज हैदराबाद येथे छापा टाकून ३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.