वर्धा -अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे हकनाक बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील वणी येथे घडली. ट्रकच्या धडकेत सोमवारी रात्री सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोहम दूधपोहे असे मृत बालकाचे नाव आहे. त्याची आजी सिंधू दूधपोहे यांचा थोडक्यात जीव वाचला आहे.
सोहम दूधपोहे हा मूळचा कोसूरला येथील रहिवासी आहे. आजीसोबत लहान वाणी येथे नरेश भडंगे यांच्याकडे तो सुट्टीसाठी आला होता. जेवण झाल्यावर रस्त्याच्याकडेला आजीसोबत तो पायी फेरफटका मारत होता. याच वेळी ट्रक ( महा २९ टी १०५९) हा बोरगाव घाटातून रेती भरून वर्ध्याला वणीमार्गे जात होता. वणी येथील गावात असलेल्या गतिरोधक वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोहमला भरधाव ट्रकने चिरडले. यात सोहमचा जागीच मृत्यू झाला झाला. त्याची आजी सिंधू दूधपोहे यांचा जीव थोडक्यात वाचला आहे. संबंधितांनी आर्थिक मदत केल्याने सोहमचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.