वर्धा- हिंगणघाट पोलीस ठाणे अंतर्गत सुलतानपूर परिसरात गुंडगिरी करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या तिघांच्या टोळीला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याचे आदेश दिले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. तिघांना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणास मज्जाव करण्यात आला आहे. या कारवाईने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सुरज यादवराव आटोळे, रोशन गजानन भगत आणि सुदन गजानन भगत असे तडीपारीची कारवाई करणात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर पोलीस ठाणे अंतर्गत नातेवाईकाकडे सोपवत ही तडीपारीची कारवाई पूर्ण करण्यात आली. तिघेही हिंगणघाट ते सुलतानपूर दरम्यान असणाऱ्या एका पुलावर बसून नागरिकांना त्रास देत होते. तिघेही गुंडप्रवृत्तीचे असून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ते त्रास देत असत. त्यांच्या या त्रासामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.