वर्धा- हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज(सोमवार) सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे ठिकठिकाणी मोर्चे काढून तिला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली. तसेच हिंगणघाट आणि वर्ध्यामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता.
'3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी'मध्ये काय काय घडले पाहा -
सोमवार 3 फेब्रुवारी -
- शिक्षिका कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
- पीडितेला उपचारासाठी हिंगणघाट शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास तिला नागपुरातील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयात हलवण्यात आले.
- आरोपी विक्की नगराळे याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली.
मंगळवार 4 फेब्रुवारी -
- पीडितेला न्याय देण्यासाठी हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीयांकडून हिंगणघाटमध्ये बंद पाळण्यात आला. तसेच राज्यातील इतर शहरांमध्येही आंदोलने, मोर्चे काढण्यात आले.
- आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बुधवार 5 फेब्रुवारी -
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेची रुग्णालयात भेट घेतली. तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवू व त्यासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती करू, गृहमंत्र्यांची माहिती.
शुक्रवार 7 फेब्रुवारी -
- आरोपीला मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेता रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली.
शनिवार 8 फेब्रुवारी -
- आरोपीला न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
- पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले.