वर्धा - बहुचर्चित हिंगणघाटच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सोमवारपासून सुरुवात झााली. यात पहिल्याच दिवशी साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढे घेण्यात आली. मंगळवारी(आज) उर्वरित साक्षीदार नोंदविले जाणार असल्याचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालयात सुनावणीला सुरुवात हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.एन.माजगावकर यांच्या समोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकारी तसेच आरोपीच्या वकीलांकडून साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ पासून दुपारपर्यंत सुनावणी चालली. अर्धा तासाच्या विश्रांती नंतर सायंकाळी ४.१५ मिनिटापर्यंत या प्रकरणात साक्षीदार नोंदवण्याचे कामकाज चालले. सरकारी पक्षाकडून जळीत प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्यावतीने शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख, तसेच मातोश्री कुणावार कॉलेजचे प्राचार्य डॉ.उमेश तुळसकर आणि घटनास्थळवरील पंच सचिन बुटले या तीन जणांच्या साक्ष न्यायालयापुढे नोंदवण्यात आल्या. या साक्षीदारांची उलटतपासणी सुद्धा आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी घेतली.मंगळवारी नोंदवणार प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष - सलग तीन दिवस कोर्टाचे कामकाज चालणार असून यात मंगळवारी न्यायालयापुढे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तसेच तपासी यंत्रणेतील काही साक्षीदारांची साक्ष होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्यावतीने या प्रकरणाचे महत्त्व जाणून विशेष सरकारी वकील उज्वल यांना न्यायालयात खटला चालवण्याचे काम काज दिले आहे. त्यांना सरकारी वकील अॅड. प्रसाद सोईतकर यांनी सहकार्य केले. या जळीतकांड प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव सोमवारी न्यायालयात उपस्थित होत्या.
काय आहे जळीतकांड प्रकरण -
प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या पीडित तरुणी मातोश्री कुणावर कॉलेजमध्ये जात असताना 3 फेब्रुवारीला आरोपीने पाठीलाग करत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिंवत जाळले होते. यात गंभीर जखमी झाल्याने नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यादरम्यान पीडित प्राध्यापिकेने आरोपीचे नाव घेतले असल्याचे प्राचार्य डॉ.तुळसकर यांच्यावतीने साक्ष नोंदवण्यात आली. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकारांना दिली.
न्यायालय परिसरात आजही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -
प्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मध्यरात्रीच न्यायालयात आणले होते.