वर्धा -जिल्ह्यात आठवडाभरापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. दोन तीन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण, पावसाची कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा शहरासह अनेक भागात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे.
वर्धा जिल्ह्यात दिवसभर पाऊस; शेतात पाणी शिरल्याने नुकसान - wardha flood news
वर्धा शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने अगोदरच पावसाचा इशारा दिल्याने भाकीत खरे ठरले. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांडव्यावरून वाहणार्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. दिवसभर पाऊस राहिल्याने कामांचा मात्र खोळंबा झाला. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे 'बॅक वाटर' वाढले. अल्लीपूर गावाचे आर्वी शहराजवळ धनोडी खुर्द येथे पुनर्वसन झाले. मात्र, अल्लीपूर गावात 21 कुटुंब अजून वास्तव्यास होती. पाऊस सतत सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ झाल्यास धोकादायक ठरू शकले असते. आजू बाजूला पाणी येऊन पोहचल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगत सकाळी पाच कुटुंब आणि सायंकाळी 11 कुटुंबातील 27 सदस्यांना स्थलांतरित करण्यात आले. तहसील कार्यालयामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची अल्लीपूर नवीन पुनर्वसन येथिल प्राथमिक शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत अविश्रांत पावसाच्या सरी जिल्ह्यातील अनेक भागात कोसळल्या. मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने शेतांमध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. नदी नाल्याच्या शेजारी असनाऱ्या शेताना याचा फटका अधिक बसल्याचे पाहायला मिळाले.