वर्धा- शहरासह लगतच्या ग्रामीण भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम राहिली. मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच धावपळ उडाली. सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती.
पिकांनादेखील पावसाची गरज निर्माण झाली आहे. आज सर्वत्र आभाळ काळभोर भरून भरून येत पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील आर्वी वर्धा या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. वर्धा शहरात अर्धा तासपावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पाऊस सुरू होताच रस्ते ओस पडले होते.
काही ठिकाणी ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळी उघडीप वाटत असतांना जोरदार पावसामुळे शेतात पीक वाऱ्याने डोलत आणि पावसाने न्हावून निघाले. शेतात गेलेल्या शेतकरी, मजुरांना कामे सोडून घरची वाट धरावी लागली. शेतात सध्या निंदण, खत देण्याची कामे सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ही कामे आज खोळंबलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आर्थिक भूर्दंडदेखील शेतकऱ्यांना आज बसला. अनेकांनी खत देण्याचे नियोजन केले होते. सकाळपासून त्यांची धावपळदेखील सुरू होती. पण, जोरदार पावसाने हजेरी लावली आणि नियोजन विस्कटले. अनेकांना खत देण्याची प्रक्रिया थांबवून आजचे काम पुढे ढकलावे लागले आहे.
काही भागात जोरदार पावसामुळे शेत-शिवारात पाणी साचले होते. तसेच नाले दुथडी भरून वाहिले. पावसाने सर्वांचीच धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खोलगट भागातील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते. या पावसाने पिकांनाही फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.