वर्धा- आर्वी तालुक्यासह लगतच्या भागात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने सावळापूर येथील मातीकाम केलेला पूल वाहून गेला. शिवाय मुसळधार पावसामुळे गावात तसेच नदी आणि नाल्याकाठच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
आर्वी शहरापासून काही अंतरावर वर्धा मार्गावरील सावळापूर हे छोटेसे गाव आहे. सध्या रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण सुरू आहे. बांधकाम प्रगतीपथावर असल्याने वाहतुकीसाठी साईडरोड करण्यात आला. पण, जोरदार पावसाची हजेरी आणि नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे मातीकाम केलेला पूल वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक बंद असून पिंपळखुट्यावरून वळवण्यात आली आहे. शिवाय बुधवारीही पाऊस असल्याने दुरुस्तीची कामे होऊ शकली नाहीत.