वर्धा- जिल्ह्यात प्रशासन व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने सिरो सर्व्हे करण्यात आला. यात जिल्ह्यातील १४ लाख लोकसंख्येच्या तुलनेत फक्त १.४ टक्के लोकांमध्येच कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडीज असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
१.४ टक्के म्हणजे २१ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. असे सर्व्हेत सांगण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा सर्व्हे करण्यात आला होता. यात ३० गावे आणि शहरातील १० वॉर्डांची निवड करण्यात आली होती. २० अॅक्टिव्ह नसलेल्या कंटेन्मेंट झोनमधील एकूण २ हजार ४३७ नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्याची सेवाग्राम रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. यामध्ये १ हजार ४६८ सर्वसामान्य नागरिक, ५६२ व्यक्ती ज्यामध्ये पोलीस, आरोग्यसेवक, हायरिस्क भागातील व्यक्तींचा समावेश होता, तर ४०७ व्यक्ती ही कंटेन्मेंट मुक्त झालेल्या भागातील होत्या.
अभ्यासात, सर्वसाधारण लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागातील १.५० टक्केच, तर शहरी भागातील २.३४ टक्के आणि कटेन्मेंट झोनमधील २.७० टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज नगण्य असल्याचे दिसून आले. तर, उच्च जोखीम असलेल्या गटांमध्ये हा दर केवळ १.४२ टक्के एवढा होता. आजच्या स्थितीत हा धोका अधिक वाढला आहे. अँटिबॉडीजची टक्केवारी १.४० असून ती कमी असल्याने नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात १ ऑगस्टपर्यंत केवळ २०५ रुग्ण होते. यावेळी जिल्ह्यात सुमारे २१ हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे सिरो सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. आकडा १.४० टक्के असल्याने कोरोनाचा धोका अद्याप संपला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ लाख लोकांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. यामुळे आजच्या घडीला ३ हजार ५८७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इतर जिल्ह्याचे अँटिबॉडीजचे प्रमाण ५० टाक्यांच्या घरात आहे.
अँटिबॉडीज निर्माण न होण्याचे कारण काय?
लॉकडाऊनच्या काळात घेण्यात आलेली काळजी आणि उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकली नाही. बाधा झाली नाही यामुळे लोकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याची गरज आहे. पुढील काळात आणखी नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.