वर्धा- लग्नात आलेल्या वऱ्हाड्यामुळे चक्क नवरदेवालाच कोरोनाची बाधा झाल्याची घटना पिपरी मेघे परिसरातील शिवराम वाडी येथे उघड झाली. अनलॉकमध्ये मोठ्या आनंदाने लग्न केल्यानंतर नवरदेवासह त्याच्या कुटूंबीयांचीही आता झोप उडाली आहे. हा नवरदेव कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. तो बाहेर जिल्ह्यात गेला नसला, तरी विवाह समारंभात बाहेर जिल्ह्यातून पाहुणे मंडळींच्या संपर्कात आल्याने नवरदेवालाच कोरोना झाल्याचा संशय आहे. या प्रकरणानंतर प्रशासन कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
याच पिपरी मेघे परिसरात यात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने कंटेंनमेंट झोन तयार करण्यात आला होता. आता याच शिवराम वाडी परिसरात 33 वर्षीय नवरदेव हा कोरोनाचा बाधित आसल्याचे उघड झाल्याने नवीन कंटेंनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. यात 30 जून रोजी या तरुणाचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात नातेवाईक हे रेडझोन किंवा अन्य बाधित जिल्ह्यातून आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे त्या नावरदेवास 5 जुलैला प्रकृती चांगली नसल्याने सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे येत्या काळात प्रशासनाने लग्नसंभारसाठी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.