वर्धा- एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे शेतमालाचे भाव पडून शेतकरी हवालदिल झाला आहे. यात टोळधाडीचे संकट शेतात येऊन पोहोचले आहे. राजस्थान, मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यात आलेली टोळधाड आता वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात पोहोचली आहे. टोळधाडीमुळे फळबागायती सोबतच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
नाकतोड्याच्या गटातील ही टोळधाड पिकांचे मोठे नुकसान करते. आष्टी तालुक्यात काही गावांमध्ये टोळने हल्ला चढवला आहे. हिरव्या पानांना कुरतडण्याचे टोळधाडने काम केले आहे. आष्टी तालुक्यातील बेलोरा वडाळा खंबीत, सहूर यासह इतर भागालाही याचा धोका पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी पोहोचताच महसूल, कृषी विभागाने पाहणीला सुरुवात केली आहे. सोबतच शेतकर्यांना उपाययोजनांबाबत जनजागृतीही केली जात आहे. अवघ्या काही वेळात पसरलेल्या टोळधाडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
राजस्थान मध्यप्रदेशनंतर वर्ध्यात टोळधाडीचा पिकांवर हल्ला; शेतकरी पुन्हा संकटात ही कीड मार्गातील वनस्पतींची हिरवी पानं, फुलं, फळ, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडून फळबागाचे नुकसान करत आहे. शेतात धूर करणे, पिंप, डफ वाजविणे फटाके फोडून आवाज आदी उपाययोजना शेतकरी करत आहेत. कोरोनामुळे कापूस, तूर, चणा पिकाला भाव नसल्याने नुकसान झाले आहे. त्यात या नुकसानीत भर पडली आहे. सरकारने या नुकसानीपोटी मदत करावी, अशी मागणी शेतकरी राहुल वांगे, राजेश ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.
कृषी विभागाकडून पाहणी चालू असून नेमके नुकसान आणि उपाययोजना काय करायचे आदी कामाला सुरुवात झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी हवेचा अंदाज घेऊन हे कुठल्या दिशेने जाणार याचा अंदाज लागतो. रात्री ज्या ठिकाणी मुक्काम करतात तेथे रात्रीच्या काळात धूर करावा, दिवसा टोळधाळ दिसून आल्यास ढोल ताशे, ताट वाजवून आवाज करावा, रात्रीच्या वेळी थांबलेल्या ठिकाणी कीड नियंत्रण बोर्ड समितीच्या वतीने शिरफास केलेल्या औषधीची फवारणी करण्याची शिफारस पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर यांनी केली.