वर्धा- ग्रामीण भागातील अर्थकारणात दुग्ध व्यवसायाची महत्वाची भूमिका आहे..मात्र लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादन तग धरुन असला, तरी त्याचा फटका दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायाला बसला आहे. दुग्ध उत्पादनांवर अवलंबून असलेले शेतकरी, दूध उत्पादक संस्था देखील आर्थिक संकटात सापडल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील गो-संवर्धन गोरस भंडारला यामुळे जवळपास 45 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि गोरस भंडार यांच्यासमोर निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.
गोसेवेच्या उद्देशातून महात्मा गांधी आणि जमनालाल बजाज यांनी वर्ध्यात 1939 साली गोरस भंडारची स्थापना केली. 10 ऑक्टोबर 1961 मध्ये ही संस्था सहकारी तत्वावर नोंदवण्यात आली. आज ही संस्था गो-संवर्धन गोरस भंडार या नावाने ओळखली जाते. गोरस भंडार शहरा लगतच्या शेतकऱ्यांच्या जोडधंद्यातील गायीच्या दूध विक्रीचे हक्काचे विक्री केंद्र आहे. येथे दिवसातून दोन वेळा दुधाची खरेदी विक्री केली जाते. दूध विक्रीसह दुधापासून 17 प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते. लॉकडाऊनमध्ये जवळपास 11 दिवस दुपारची विक्री बंद राहिली. दूध विक्री सोबतच उत्पादनांना ग्राहक मिळाला नसल्याने गोरस भंडारला मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे.
ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचे हक्काचे ठिकाण...
गोरस भंडारसोबत जवळपास 15 दुग्ध संकलन संस्थांचे 760 दुग्ध उत्पादक जोडलेले आहेत. गोरस भंडार येथे विविध विभागात कार्यरत पदाधिकारी, घरो घरी जाऊन दूध वाटणारे कर्मचारी, बेकरी, दुगधजन्य पदार्थ निर्मितील कर्मचारी असे 1 हजार जण यांसस्थेवर अवलंबून आहेत. लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे सरासरी 5 हजार लोकांचे अर्थकारण प्रभावित झाले आहे. वर्षाला 27 कोटींच्या घरात उलाढाल असणारे गोरस भंडार लॉकडाऊनमुळे तीन ते चार महिन्यात 45 लाख रुपयांने तोट्यात असल्याची माहिती संस्थेचे सचिव माधव कडू यानी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.