वर्धा -कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे. शेती असून वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पडीक आहे. यामुळे शेळीपालनातून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सुरजूसे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आले.
कारंजा येथे बकऱ्यांचा चोरी कारंजा तालुक्यातील पिपरी या गावातील अर्चना सुरजूसे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. शेती जंगलाला लागून असल्याने शेतीचे नुकसान होते या सबबीवर पडीक पडलेली आहे. यामुळे शेळी पालनाच्या व्यवसायावर आतापर्यंत या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. पण बुधवारी पहाटे चोरट्यांनी बकऱ्या चोरून नेल्याने त्यांचा आर्थिक रोजगार हिरावून गेला आहे. मागील अनेक महिन्यांपासून परिश्रम घेत या बकऱ्या विक्रीसाठी तयार झाल्या होत्या. पोळ्याच्या सणाला या बकऱ्या विकून येणाऱ्या पैशात त्या घरासाठी काढलेले कर्ज फेडणार होत्या. मात्र आता या बकऱ्यांची चोरी झाल्याने हे कुटुंब आता आर्थिक संकटात सापडले आहे. विशेष म्हणजे हे चोर बकऱ्या ओरडू नये यासाठी त्यांना गुंगीचे औषध देतात. तसेच आवाज येऊ नये यासाठी बकऱ्यांच्या गळ्यातील घुंगरू काढून टाकतात. यापूर्वी देखील अशाच प्रकारे 35 बकऱ्यांची चोरी राजनी गावात झाली होती. या वाढत्या घटनांमुळे शेतीला पूरक जोडधंदा करणाऱ्या नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारंजा पोलिसात या दोन्ही घटनांची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.