वर्धा- मागील काळात झालेल्या दुर्लक्षाने गवळाऊ नामशेष होत चालली आहे. यामुळे या प्रजातीच्या गायीचे जतन करणे महत्वाचे आहे. गवळाऊ गायींपासून आपल्याला मिळणारा फायदा पाहता ते प्रगतीच्या वाटचालीला हातभार लावणारी आहे. मुलांसाठी मिळणारे पौष्टिक दूध असो की शेतातील काटक काम दोन्ही अंगाने म्हत्वाची आहे. पण, आता दुर्लक्ष न करता गवळाऊ जतन केले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनी व्यक्त केले.
वर्धेतील गवळाऊ गायीच्या प्रदर्शनीबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी सरिता गाखरे खरांगणा-मोरांगणा येथे आयोजित गवळाऊ प्रदर्शनीत बोलत होत्या. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती आर्वीच्या संयुक्त विद्यमाने गवळाऊचे प्रदर्शन आणि दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत पुढे बोलताना अध्यक्षा गाखरे म्हणाल्या की, परदेशी गाईंप्रमाणे गवळाऊ ही देशी गायसुद्धा १० लिटर दूध देते. या गाईची रोग प्रतिकाराक शक्ती आणि तिचे संगोपन खर्च कमी असल्यामुळे गोपालकांनी वर्धा जिल्ह्याची ओळख असलेल्या गवळाऊ गाईचे पालन आणि संगोपन करायला पाहिजे, असे सांगितले.
जिल्हा परिषदेकडून अनुदान देताना गवळाऊ गाय घेण्याचा आग्रह गोपालकांना केला जातो. गवळाऊ प्रजातीच्या रक्षणासाठी हा आग्रह बंधनकारक करण्याची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून विभाग अंतर्गत प्रदर्शनी भरवल्या जात आहे. यात आपल्या भागात असणारी गवळाऊचे जतन व्हावे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रात ती पोहोचावी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद कृषी सभापती मुकेश भिसे म्हणाले.
या पशू प्रदर्शनीत 'चॅम्पियन ऑफ द शोचे' बक्षिस गोरक्षण गोकूल नांदोरा येथील अभिषेक हरिकीसन मुरके यांच्या वळूला मिळाला. वळू गटातील प्रथम पुरस्कार अभय कलोकार यांच्या वळूला तर, गाय गटात खरंगण्याचे भोजराज अरबट यांच्या गायीला प्रथम पुरस्कार मिळाला. दूध स्पर्धेत गोपालक देविदास राऊत यांना प्रथम बक्षिस देण्यात आले. होलेस्टाईन गायी आल्याने दूधाचे प्रमाण वाढले आहे. पण, यामुळे आरोग्य संवर्धक गवळाऊचे दूध आज आपल्यातून जाऊन आरोग्याला फारसे पोषक नसलेल्या दुधाला आपण पसंती दिली. अनेक संशोधनात हे स्पष्ट झाले असतानाही या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. आज विदर्भातील तापमान पाहता गवळाऊ वंशाची गाय उत्तम पर्याय आहे. या गायीचे संगोपन केल्यास सुदृढ आरोग्य लाभेलच पण आरोग्यम धनसंपदाही लाभेल यात कुठलीच शंका नाही.
यावेळी आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, कृषी सभापती मुकेश भिसे, समाज कल्याण समिती सभापती नीता गजाम, जीप सदस्य राजश्री राठी, विनोद लाखे पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे, पंचायत समिती सदस्य नितीन अरबट प्रादेशिक पशू संवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे- गुल्हाने, पशुधन विकास अधिकारी डॉ. भाकचंद वंजारी उपस्थित होते. यासह पशुधन विकास अधिकारी, परिचर प्रशांत भोसले यांनी परिश्रम गवळाऊ गोपालकाना सहभागी करून घेण्यास महत्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा-वर्ध्यात 21 वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू