वर्धा - बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असतानाच जिल्ह्यात चिंताजनक बाब समोर आली आहे. जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळले आहेत.
अचानक चार राष्ट्रीय पक्षी हे बुधवारी (13 जानेवारी) मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. राज्यात सर्वत्र बर्डफ्ल्यूचे संकट ओढवले आहे. मात्र, मोराचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, परीक्षण अहवालानंतर स्पष्ट होईल.
बोरगाव शिवारात मोर मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या चमूने तत्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मृत मोरांची पाहणी केली. मृत मोरांपैकी काही पक्ष्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहे. पुण्यातून तपासणीचे अहवाल आल्यानंतरच मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. वनविभागाकडून पुढील कारवाई केली जात आहे.
र्ड फ्लूच्या संकटातच चार मोर आढळले मृतावस्थेत!
पीपीई किट घालून करण्यात आले नमुने गोळा
मृताअवस्थेत आढळेल्या पक्ष्यांच्या संदर्भात बर्डफ्ल्यू हाय अलर्ट देण्यात आला आहे. काळजी म्हणून पीपीई किट घालत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी बर्डफ्ल्यूच्या तपासणीसाठी नमुने गोळा केले. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा-बर्डफ्लूचा धोका वाढलने एका रात्रीत 10 हजारहून अधिक कोंबड्या नष्ट
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2006 मध्ये झाला होता बर्ड फ्लूचा प्रसार -
2006 साली महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सर्वात पहिल्यांदा बर्ड फ्लूचा प्रसार झाला. यावेळी सुमारे १० लाख पोल्ट्री पक्ष्यांची कत्तल करण्यात आली होती. जेसीबीच्या साहाय्याने खड्डे खोदून पक्ष्यांना गाडण्यात आले होते.
हेही वाचा-परभणी: 'बर्ड फ्लू'चे थैमान, 5000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरवात
बर्ड फ्लू नक्की कोणत्या विषाणूमुळे होतो ?
बर्ड फ्लू ला एव्हिएन एनफ्लूएन्झा असेही नाव आहे. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून पक्षांमध्ये आढळतो. एनफ्लूएन्झा टाईप A प्रकराचा H5N1 विषाणू यास कारणीभूत आहे. या विषाणूच्या इतरही स्ट्रेन (विषाणूची साखळी) तयार झाल्या आहेत. H5N2 आणि H9N2 ह्या इतर स्ट्रेन असून त्यांचा प्राण्यांतून माणसातही प्रसार झाल्याचे आढळून आले आहे. बर्ड फ्लूचा विषाणू सर्वात पहिल्यांदा चीनमधील हाँगकाँगमध्ये १९९६ साली आढळून आला होता. हंस पक्षाच्या प्रजातीतील गीज पक्षात हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता.
बर्ड फ्लूचा प्रसार कसा होतो?
- पाण्याच्या आसपास राहणाऱ्या स्थलांतरीत पक्षांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. पक्षांच्या विष्ठेतून बर्ड फ्लू च्या टाईप A विषाणूचा प्रसार दुसऱ्या पक्षांतही होतो.
- पाण्यातून संपर्क आल्यास बर्ड फ्लूचा प्रसार होतो.
- पक्षी एकमेकांच्या संपर्कात आल्याने नाकातील स्त्रावाद्वारे बर्ड फ्लूचा प्रसार होतो.
- बर्ड फ्लूने दूषित झालेल्या अन्न आणि पाण्याच्या संपर्कात पक्षी आल्याने रोगाचा प्रसार होता.