वर्धा- जिल्ह्यात शुक्रवारी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा आणि वर्धा शहरातील रामनगरमधील एकाचा समावेश आहे. या सर्वांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अकरा झाली असून सद्यस्थितीत केवळ एक रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्यांमधील वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील एक रुग्ण 6 जूनला कोरोनाबाधित आढळला होता. नंतर त्याच्या संपर्कात आलेले घरातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील रामनगरमधील एक व्यक्ती ८ जूनला कोरोनाबधित असल्याचे समोर आले. या चारही रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.