वर्धा- आर्वी येथे एका महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. आता तिचे 41 दिवसाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. दोघांवरही सेवाग्रामच्या कोविड केअर रुगणालयात उपचार सुरू आहेत.
आर्वीच्या सिंधी कॅम्पमध्ये ही महिला अकोला येथून 24 मे रोजी माहेरी आली होती. यात तिची प्रकृती बिघडल्याने तिला आर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला.
यात तिच्या बाळालाही लागण झाल्याची शंका होतीच. शिवाय त्या बाळाला आईजवळ ठेवायचे की नाही, हा प्रश्न होताच. शनिवारी आलेल्या कोरोना अहवालात त्या 41 दिवसाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली. यात आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून त्यांच्यावर कोरोना केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.
कोरोना असताना बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. याच महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी क्वॉरंन्टाइनचे नियम मोडल्याने प्रशासनाने 40 हजाराचा दंड सुद्धा ठोठावला होता.