वर्धा -देशभरात महात्मा गांधींचे 150वे जयंती वर्ष साजरे होत आहे. अशात गांधी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यात सर्व सेवा संघाचे कामचलाऊ अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांना पायऊतार करण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यासह त्यांच्या जागेवर पुढील निवडणुकीपर्यंत कोलकात्याचे चंदनपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महादेव विद्रोही यांनी मागील सहा महिन्यात केलेले सर्व कामकाज बरखास्त करण्यात आले. सर्व सेवा संघाचा कार्यकाळ हा मार्च महिन्यातच संपला असून त्याच वेळी निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही. याच कारणामुळे विद्रोहींकडेच पुढील निवडणुकांपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला. मुळात या काळात त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी नव्हती. तरिही त्यांनी याच काळात अनेकांच्या नियुक्त्या रद्द करणे, नवीन सदस्यांची निवड करणे, असे अनेक निर्णय घेतले. हे निर्णय चुकीचे असल्याने वरिष्ठ स्तरावरून हा प्रकार थांबवण्याचे त्यांना पत्रव्यवहाराद्वारे सुचवण्यात आले होते. मात्र, तरिही त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा -'..अजूनही मी मुक्ताईनगरातच आहे, राष्ट्रवादीत जाण्याविषयी अद्याप निर्णय नाही'