वर्धा - एका जिल्ह्यातून / राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी आता राज्यस्तरावर एकच पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वर्धा जिल्हयातून बाहेर जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी तसेच बाहेर जिल्ह्यातुन, राज्यातुन वर्धा जिल्ह्यामध्ये येण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी http:/covid19.mhpolice.in या पोर्टलवर परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
कोरोना संसर्गासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले. तसेच सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. वर्धा जिल्ह्यातही इतर राज्यतील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकले आहेत. राज्य व केंद्र शासनाने नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
प्रवासाची परवानगी कशी घ्याल -
राज्यात व देशातील विविध भागात जाण्यासाठी आता राज्यस्तरावरील http://covid19.mhpolice.in या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा. यामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती, प्रवासाचे कारण, प्रवास कुठून कुठे करायचा आहे, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे. सोबत, आधारकार्ड, स्वतःचा फोटो, नोंदणीकृत डॉक्टरांचे इन्फ्लुएन्झा, सारी किंवा कोविड - 19 ची लक्षणे नाहीत, असे फिटनेस प्रमाणपत्र जोडायचे आहे. यामध्ये छायाचित्राचा आकार कमी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर केल्यावर एक टोकन क्रमांक देण्यात येतो. तसेच मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या पुढील प्रक्रियेचा संदेश प्राप्त होतो. पोर्टलवर जाऊन सुद्धा ई-पासची सद्यस्थिती तपासता येते, तसेच ई-पास तयार झाल्यावर पोर्टलवरून डाउनलोड करता येते. फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक प्रवासाची ऑनलाइन परवानगी घेताना त्यामध्ये नोंदणीकृत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. 99 टक्के अर्ज हे प्रमाणपत्र न जोडल्यामुळे नाकारण्यात येत आहेत.