वर्धा - शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या न्यू ओम प्लास्टिक दुकानाला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत मोठा प्लास्टिक साठा जळून खाक झाला आहे. जवळपास चार तास अग्निशामक बंब आणि लिक्विड फोमच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रात्री उशिरा पर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, या आगीत जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.
न्यू प्लास्टिक दुकानात शॉर्ट सर्किटने लागली आग... रविवारी, दुपारी काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत झाला. तेव्हा दुकानातून अचानक धूर निघायला सुरुवात झाल्याने दुकानात आग लागल्याचे समजले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे दुकानाचे मालक मुरली केला यांनी सांगतले. आगीत भस्मस्थानी सापडलेले न्यू ओम प्लास्टिक दुकान अनिल केला, मुरली केला यांच्या मालकीचे आहे. दुकानातील प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट, ग्रीन नेट तसेच गार्डन पाईप, शेतीसाठी लागणारी मोठया ताडपत्र्या असे साहित्य आगीत पूर्णतः जळून खाक झाले.
आग लागलेली पाहून वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, भुगाव आदी ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवळपास 12 ते 15 बंब आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, प्लास्टिक जळत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला जिकिरीचे प्रयत्न करावे लागले. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन बंब आणि लिक्विड फोनमुळे आग आटोक्यात आली.
यावेळी परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. लोकांची गर्दी नियंत्रित करताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करावा लागला. यात व्यापारी अनुराग गोयंका यांच्यासह आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या या कारवाई विरोधात काही व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोम लिक्विडचा वापर -
दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचण येत होती. पाण्याचा मारा करूनही आग विझवण्यात यश न आल्यास तसेच आगीवर प्लास्टिक ऑइल किंवा ज्वलनशील पदार्थ असल्यास आग विझवण्यासाठी लिक्विड फोमच्या उपयोग केला जातो. याच लिक्विड फोमचा उपयोग करत वर्धा नगर परिषदचे फायरमन आणि कर्मचाऱयांनी दुकानामध्ये जाऊन फोम लिक्विडचा मारा केला. यामुळे ऑक्सिजन नाहीसे होऊन आग पेटण्याऐवजी विझवण्यात यश मिळाले. यामध्ये फायरमन संतोष मरगवाडे, सहकारी सय्यद सुजाड अली, चेतन खंडारे, आकश तांबेकर, फायर अधिकारी रवींद्र जगताप फायर अधिकारी, यांनी यात मोठे परिश्रम घेतले.
घटनास्थळाची पाहणी आणि पोलीस बंदोबस्त -
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. यानंतर आमदार पंकज भोयर यांनीही पाहणी केली. नगराध्यक्ष अतुल तराळे हे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. तसेच तहसीलदार प्रीती दुडुलकर याही पाहणीसाठी आल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक योगेश पारधी, यांच्यासह पीएसआय चेतन बोरखेडे यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी उशिरापर्यंत उपस्थित होते.
दरम्यान, यंदा पावसाने दडी मारल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा होता. शेतीच्या कामासाठी लागणारे ताडपत्री, तसेच रेनकोट , छत्री याचा दोन दिवसापूर्वीच दोन ट्रक साठा करण्यात आला होता. अशी माहिती दुकान मालकाने दिली.