वर्धा - जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील एक मुलगी गर्भवती आहे. दोन्ही मुली नागपुरात आजीकडे गेल्या असताना ही घटना उजेडात आली. आर्वी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.
धक्कादायक : जन्मदात्या बापानेच केला दोन मुलींवर अत्याचार - आर्वी पोलीस स्टेशन बातमी
जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातील एक मुलगी गर्भवती आहे.
सध्या आर्वी शहरात वास्तव्यास असणारा हा व्यक्ती मूळचा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. परिवाराला घेऊन तो काही वर्षांपासून आर्वी या सासुरवाडीत राहायला आला. येथे तो पत्नीसह 13 वर्षीय आणि 14 वर्षीय दोन मुलींसह वास्तव्यात होता. याच दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाने पोटच्या दोन्ही मुलींवर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
काही दिवसांपूर्वीच दोन्ही मुली नागपूरला आजीकडे गेल्या होत्या. यावेळी एकीची प्रकृती बिघडल्याने ती गर्भवती असल्याचे कळताच हे धक्कादायक प्रकार समोर आला. यात दोघींनी त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची माहिती दिली. लगेच या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसात करण्यात आली. घटनास्थळ आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपासात आर्वी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे. यात मुलींची वैद्यकीय तपासणी करत तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे करत आहे.