वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या घटनेने महाराष्ट्र पुरता हादरून गेलाय. या घटनेतून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची क्रूरता दिसून आली. क्रूरतेच हे रूप याच समाजातील एका विकृतीमुळे पुढे आले. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचाराला अनुसरून समाज घडवण्यासाठी चिंतन मनन करण्याची गरज पुढे आली. पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत उपवास आणि आत्मचिंतन करत समाजाला विचार करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यंदाचे वर्ष महात्मा गांधीचे १५० तर विनोबाजींचे १२५ वे जयंतीवर्ष आहे. गांधीजींनी सांगितलेल्या हिंसेचा त्याग करण्यासाठी समाज कुठे तरी कमी पडत आहे. समाजाच्या दृष्टीने स्त्रियांची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचारांना अनुसरुन समाज घडविण्यासाठी पशु संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ असा १२ तास उपवास केला. त्यांच्या या उपवासात विद्यार्थी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. यामुळे महिलांना सन्मान दिला पाहिजे, ही बाब समाजात रूजने गरजेचे असल्याचेही पुढे आले.
यावेळी माजी आमदार अमर काळे यांनी दुर्गा म्हणून आदिशक्तीला पुजले जाते. मात्र, दुसरीकडे होणाऱ्या घटना पाहता सर्व समाजाने आत्मचिंतन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यामध्ये सकाळपासून सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींसह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांनीसुद्धा सहभाग नोंदवला.