वर्धा :जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील निंबोली, काशिमपूर, सर्कसपूर, एथलापूर, टोणा, अहिरवाडा, रहिमाबाद, देउरवाडा, अंबिकापूर, भाईपूर, दौलतपूर, कर्माबाद आदी भागात अवकाळी पावसाने नुकसान केले आहे. सततच्या खराब हवामानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळीचा पंचनामा करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातून सावरण्यासाठी रब्बी हंगामात हरबरा आणि गहू पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, त्यालाही अवकाळी पावसाने नेस्तनाबूत केले आहे. हरभरा पिक नैसर्गिक आपत्तीतून कसेबसे वाचले. पण हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक पावसाने मातीत मिळवले आहे.
आपण कसे जगले पाहिजे :जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता जगायचे कसे, असा सवाल शेतकरी करत आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली असून नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. तरच शेतकरी अवकाळी पावसापासून सावरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.