वर्धा -वर्ध्यात ऐन होळीच्या सणावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. यामध्ये गहू, हरभरा आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने स्थायी समितीच्या सभेतून शासनाकडे करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने मदत मिळावी, यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. ढोरकाकडा वनस्पती खाल्ल्याने अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये गोपालकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे गोपालकांना मदत देण्याच्या मागणीचा ठरावही घेण्यात आला.
अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून मदत द्या.... माजी अध्यक्ष तथा सदस्य नितीन मडावी, माजी सभापती भिसे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता बाळगावी, जनजागृती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. साटोडा ग्रामपंचायतीमध्ये आलोडी गावाचा समावेश आहे. आलोडीची स्वतंत्र ग्रामपंचायत करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत. यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष सरिता गाखरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, लेखाधिकारी शेळके, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे आदींची उपस्थिती होती.