वर्धा -जिल्ह्यातील पिपरी मेघे आणि पांढरकवडा भागातून जाणारा समृद्धी महामार्गाचा चार नंबरचा इंटरचेंज काढून टाकण्यात आला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात येणारी समृद्धी ही थांबली आहे. शेतीची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शेवटच्या टप्यात असल्याने पैसे मिळतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी स्वतः कडील पैसे इतरत्र गुंतवले. याशिवाय मागील दोन वर्षापासून शेती पडीक राहिल्याने नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आता नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
समृद्धी महामार्ग हा आर्वी-वर्धा मार्गावरील येलाकेळी जवळच्या परिसरात पिपरी मेघे आणि पांढरकवडा येथून जात होता. यासाठी समृद्धी महामार्गाच्या वतीने जमीन अधिग्रहण करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करण्यात आले होते. यासह शेतकऱ्याच्या जमीन अधिग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. जमिनीसंदर्भात नोटरीसुद्धा झाली होती. आर्थिक मोबदला मिळणार मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर पेरणीसुद्धा केली नाही, परिणामी जमीन पडीक राहिली. शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला चार पट मिळणार असल्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. समृद्धी महामार्गाने आयुष्यात समृद्धी येणार म्हणून शेतकरी आनंदी होते.