वर्धा- जिल्हा हा महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पावनस्पर्शाने पुनित झाला आहे. या महान व्यक्तींमुळे जिल्ह्यात दारूबंदी 1975 पासून लागू झाली. पण, ही दारूबंदी इतक्या वर्षांनंतरही केवळ नावापुरतीच झाल्याचे पाहायला मिळते. याला विविध कारणे असली तरी महत्त्वाचे कारण म्हणजे, पोलिसांवर होणारे आरोप. हे आरोप म्हणजे दारूविक्रेत्यांशी पोलीस प्रशासनातील आर्थिक हितसंबंध हेच महत्त्वाचे कारण पुढे येताना दिसत आहे. यामुळेच स्थानिक पोलीस ठाण्यामधून न्याय न मिळाल्याने दारूबंदी मंडळाच्या महिलांनी आमदार पंकज भोयर यांच्यासोबत थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला.
हेही वाचा -मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला मिळणार नवी झळाळी
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील वडगाव जंगली येथे सावित्रीबाई फुले दारूबंदी मंडळाच्या महिलांनी दारूबंदीचा विडा उचलला आहे. यापूर्वीही गावात दारूचे पाट वाहत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या. पण, कारवाई नावापूर्तीच झाली. एकीकडे दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तेच दुसरीकडे पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकत दारूविक्रेते खुलेआम विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, दारूविक्रेते याची कबुलीही देतात. पोलिसवाले येतात हप्त्याचे तुकडे घेतात आणि जातात. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी धंदा असाच सुरू राहणार, असे दारूविक्रेते बोलत असल्याचा आरोप दारूबंदी मंडळाच्या महिलांनी केला.
गावात दारूबंदी व्हावी. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार पुन्हा उभे रहावे यासाठीच दारूबंदी मंडळाच्या माध्यमातून महिलांची दारूबंदीसाठी धडपड सुरू असते. आज हे चित्र पोलीस अधीक्षक कार्यालयात पाहायला मिळाले. एक लहान मुलगा आपल्या आईचे बोट धरून दारूबंदीची व्यथा मांडणाऱ्या आपल्या आईसोबत आला होता. दारूबंदी काय असते, याचे परिणाम त्याला नक्कीच माहीत नाही. पण, याची जाणीव असणारी आई अशा अनेक लहान मुलांचे भविष्य सुकर होण्यासाठी प्रयत्न करताना पोलीस अधीक्षक कार्यालयात दिसली.