वर्धा - आर्वी येथील गर्भपात प्रकरणाची ( Abortion Case at Aarvi )आरोग्य संचालकांनी दखल घेतली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक पुणे डॉ अर्चना पाटील यांनी सहा सदसीय अभ्यासगटाची स्थापना केली. या अभ्यासगटाला दहा दिवसात प्रकरणाचा संपूर्ण अभ्यासपूर्ण चौकशी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लवकरच अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून 10 दिवसात समिती अहवाल देणार असल्याचेही सांगितले जात आहे.
या अभ्यासगटात नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, सहाय्यक संचालक डॉ. दिगंबर कानगुले, राज्य पीसीपीएनडीटीच्या अशासकीय सदस्य डॉ. आशा मिरगे, युएनएफपीएच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती अनुजा गुलाटी आणि सल्लागार डॉ. आसाराम खाडे, सल्लागार अॅड. वर्षा देशपांडे यांचा समावेश आहे.
असे असणार समितीचे कामकाज -
- प्रत्यक्ष घटनास्थळी, उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे भेट देणार आहे.
- गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ या कायद्याचा उल्लंघन झाले आहे का याबाबत दस्तावेजाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणार
- वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ सुधारित २०२१ चे उल्लंघन झाले आहे का याबाबत दस्तावेजाचा सविस्तर अभ्यास करावा
- गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ आणि वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ सुधारित २०२१ च्या अंमलबजावणीबाबत काही त्रुटी आहेत का? याबाबत दस्तावेजाचा सविस्तर व सखोल अभ्यास करणार आहे
- सदर अभ्यासादरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविणे व अभ्यासाच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत मा. राज्य समुचित प्राधिकारी, पीसीपीएनडीटी तथा अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य, पुणे यांना सादर करणार.