वर्धा - जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. सुनील गायकवाड (वय ५२ वर्ष) असे या शाखा अभियंत्यांचे नाव आहे. कंत्राटदाराला कामाचे देयक काढून देण्यासाठी १ लाख ३५ हजारांची मागणी गायकवाड याने केली होती.
हेही वाचा - भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांचे महाआघाडीच्या बाजूने मतदान, म्हणाले...
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत खासगी कंत्राटदाराने सेलू तालुक्यातील वडगाव कला ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते. या कामाची नोंदही करण्यात आली होती. मात्र तरीही कामाचे देयक काढून देण्यासाठी गायकवाड याने कंत्राटदाराला १ लाख ३५ हजारांची लाच मागितली होती. यातील ५० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अभियंत्यांला अटक केली.
हेही वाचा - तेलंगणा बलात्कार,खून प्रकरण; आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर याच्या मार्गदर्शनात सापळा रचून रवींद्र बवणेर, संतोष बावनकुळे, रोशन निंबाळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, प्रशांत वैद्य, कैलास वालादे, निशांत कुटेमाटे, प्रदीप कुचनकर, पल्लवी बोबडे, स्मिता भगत यांच्या पथकाने लाचखोरावर ही कारवाई केली.