वर्धा - जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्सने बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. या धडकेत ११ प्रवासी जखमी झाले असून यात ९ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आज (सोमवारी) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारात डी.एन.आर कंपनीची ट्रॅव्हल्स (क्रमांक MH-३४, AV-१२७७) भरधाव वेगाने चंद्रपुरकडून नागपूरला जात होती. दरम्यान, वर्ध्याकडून समुद्रपूरकडे जाणारी बस (क्रमांक MH -१४, BT - १२५२) शेडगावं चौरस्त्यावर रस्ता ओलांडत असतांना ट्रॅव्हल्सने बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. यावेळी बसमध्ये मांडगाववरून समुद्रपुरला शाळेत जाणारे विद्यार्थी होते. या धकडेत 9 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहे. अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार, (दोन्ही रा. भुगाव) तसेच रामा विनायक बांधेकर रा. नागपूर या प्रवाशांचाही जखमींमध्ये समावेश आहे.