वर्धा - खेळत असताना बालिकेचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना समुद्रपूर तालुक्यातील गणेशपूर पारधी बेड्यावर शुक्रवारी घडली. सविना पवार असे या मृत बालिकेचे नाव आहे. त्या बालिकेला लागलीच तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
सविनाचे वडील इंद्रदास पवार यांनी घराचे वीज बिल भरले नव्हते. सहा महिन्याअगोदर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत बिल न भरल्याने इंद्रादास पवार यांचे वीज मीटर काढून नेले. मात्र, यावेळी सर्व्हिस वायर तशीच राहून दिली. याच सर्व्हिस वायरमधून त्याने थेट अवैधरित्या विद्युत पुरवठा घेतला. याच अवैधरित्या घेतलेल्या विद्युत पुरवठ्याची बळी आठ वर्षाची सविना पवार ठरली.
घरात घेतलेल्या अवैध पुरवठ्यातून पंखा लावण्यात आला होता. या पंख्याची लावण्यात आलेली वायर ज्या टिनचा पत्रा उडून जाऊ नये, म्हणून वरील बाजूने तार ओढून जमिनीवर ठेवलेल्या एका वजनदार मोटरपंपला बांधून होती. याच तारेला सविनाचा अंगणात खेळताना स्पर्श झाला. त्यावेळी जोराचा विद्युत प्रवाहाचा झटका बसला. यानंतर तिला समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिचा उपचार करताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा -मिशन धारावी : कोरोना योद्ध्यांना मशिदींचा 'असाही' झाला उपयोग
घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन विद्युत जोडणीची तपासणी करण्यात आली. यावेळी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरकडून अहवाल मागवून त्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल, असे सांगितले जात आहे.