वर्धा :सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक, कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय कार्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आर्वी उपविभागातील तालुक्यांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. टप्याटप्याने संपुर्ण जिल्ह्यात ती कार्यान्वित केली जाणार आहे.
ई-ऑफिस प्रणाली : राज्य शासनाच्या महाआयटी या कंपनीद्वारे ही प्रणाली राबविण्यास काही वर्षांपासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात केवळ मंत्रालयात या प्रणालीचा अवलंब केला जात होता. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये ई-ऑफिस प्रणालीने जोडली गेली. सर्वस्तरावरील शासकीय कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा येथे रुजू झाल्यानंतर तीनही उपविभागीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित केली.
आर्वी उपविभाग आघाडीवर : तालुकास्तरावर देखील ही गतीमान प्रणाली कार्यान्वित झाली पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसिलदारांशी चर्चा केली. तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणे घेतली. या प्रणालीच्या वापरास सुचना केल्या. त्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य महाआयटीच्यावतीने तालुक्यांना उपलब्ध करून दिले. पहिल्या टप्प्यात आर्वी उपविभागातील आर्वी, कारंजा, आष्टी या तालुक्यात प्रणाली कार्यान्वित झाली आहे.
पेपरलेस कामकाज :सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने निकाली निघावी, त्यांचा त्रास आणि पैसा वाचावा यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयोगी ठरली आहे. शासकीय विभागांच्या विविध फाईल्स प्रत्यक्ष या टेबलवरुन त्या टेबलवर फिरतात. ई-ऑफिसच्या पेपरलेस कामकाजामुळे फाईली ऑनलाईन सादर होतात. ऑनलाईनच पुढे जात असल्याने फाईलींचा निपटारा वेळेत होतो. शिवाय कामात पारदर्शकता, गतिमानता देखील येते. सर्वसामान्य नागरिकांचे कार्यालयांमध्ये येणारे अर्ज, विनंत्या, तक्रारी या देखील ई-ऑफिसद्वारे सादर होत असल्याने त्यावर देखील कालमर्यादेत कारवाई होते.
ठरला पहिला तालुका :जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर तहसिल कार्यालये ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आर्वी उपविभागातून सुरुवात करण्यात आली. या विभागातील आर्वी तालुक्याने ई-ऑफिसला प्रारंभ केला. राज्यात हा तालुका या प्रणालीचा वापर करणारा पहिलाच तालुका ठरला आहे. त्यानंतर कारंजा, आष्टी तालुक्याने देखील ई-ऑफिसला प्रारंभ केला आहे.
अत्यंत प्रभावी प्रणाली : ई-ऑफिस ही अत्यंत चांगली प्रणाली आहे. एखाद्या विषयाची फाईल ही पुर्णपणे ऑनलाईनच सादर होत असल्याने फाईलींचा पसारा कमी होतो तसेच कामाची गती वाढते. नागरिकांना होणारा त्रास कमी होतो असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले आहे. कार्यालयात ही प्रणाली गेल्या काही वर्षांपासून राबविली जात आहे. येथे आल्यानंतर उपविभागीय कार्यालयात प्रणाली सुरु केली. तालुकास्तरावरही प्रभावीपणे राबविता येईल का? याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांशी चर्चा केली आहे. त्याप्रमाणे नियोजन केले. आपण तालुकास्तरावर ही प्रणाली राबवू शकलो, याचा आनंद आहे. टप्याटप्याने संपुर्ण जिल्ह्यात ही प्रणाली राबविणार आहोत, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
हेही वाचा - Death Of Poisoned Woman In Mumbai: खळबळजनक! मंत्रालयाकडून दाद न मिळाल्याने महिलेने घेतले विष; अखेर मृत्यू