वर्धा - सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव (दांडेकर) येथे गुन्ह्याचा नाट्यमय खुलासा झाला आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. मृतदेह घाटावर नेण्यात येत होता. त्याच वेळी पोलीस गावात पोहोचले; आणि सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर मुलानेच बापाची हत्या केल्याचे उघडकीस आले. कवडू चंद्रभान पंधरे (वय 60) असे मृताचे नाव असून मंगेश हे आरोपी मुलाचे नाव आहे.
खून करुन बापाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना पोलीस आले...आणि बिंग फुटले! - वर्धा क्राइम
सिंदी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरगाव (दांडेकर) येथे गुन्ह्याचा नाट्यमय खुलासा झाला आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. मृतदेह घाटावर नेण्यात येत होता. त्याच वेळी पोलीस गावात पोहोचले; आणि सर्वत्र खळबळ उडाली.
रविवारी दारूच्या नशेत मंगेश घरात पोहोचला. यावेळी वडिलांचे आणि मंगेशचे कडाक्याचे भांडण झाले. दारूच्या नशेतच त्याने वडिलांना डोक्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये त्यांचा जीव गेला. कोणालाही कळायच्या आधीच अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली.
अंत्यविधीला लागणारे साहित्य, सरण, आणि मृतदेह घाटावर नेण्याची तयारी सुरू असताना ठाणेदार प्रशांत काळे पोलीस पथकासह पोहोचले. यावेळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी पंचनामा करत मंगेशला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची कबुली देत वडिलांच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप पुढील तपास सुरू आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याने गुन्ह्यातील कलमं वाढण्याची शक्यता आहे.