वर्धा - कडक संचारबंदीच्या काळात प्रशासकीय सेवा सुरू आहे. पण ग्राहक सेवा बंद आहे. यामुळे निराधार योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊनही काढण्यास अडचणी येत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात बँक मित्रांच्या सहकाऱ्याने 'बँक आपल्या दारी' सेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील 850 गावांमधील गावकऱ्यांना पैसे उपलब्ध करण्याचे काम 250 सखींच्या माध्यमातून केले जात आहे.
डोअर टू डोअर बँक सर्व्हिस; 850 गावात जाऊन ग्राहकांच्या हातात दिले पैसे
कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली असताना ग्रामीण भागातील बँक मित्रांच्या मदतीमुळे जवळपास 250 सखींना रोजगार मिळाला आहे. या सोबतच गावातील व्यवहार सुरू राहण्यास मदत मिळाली आहे.
निराधार नागरिकांना घरापर्यंत बँक
जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे बँकेतही ग्राहकसेवा बंद आहे. शहरी भागात अडचणीच्या वेळी नागरिकांना एटीएमद्वारे पैसे काढण्याची व्यवस्था आहे. पण ग्रामीण भागात नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेतच जावे लागते. यात संचारबंदीमुळे बँकांनी गावातच सेवा देण्याचा निर्णय घेतला. श्रावण बाळ, संजय गांधी, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पैशांची गरज भागविण्यासाठी बँकेचे 'बँक मित्र' ग्रामीण भागात डोअर टू डोअर सेवा देत आहेत. यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि निराधार नागरिकांना बँक घरापर्यंत येत पैसे देत असल्याने घराबाहेर न पडताच आर्थिक अडचण दूर होण्यास मदत झाली आहे.
कसे आहे पैसे वाटपाचे नियोजन
जिल्ह्यतील सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे 250 बँक मित्र आणि सखी यांनी गावात योग्य सामाजिक अंतर ठेऊन काहींना घरी तर काहींना ग्रामपंचायतमध्ये बँक सेवा द्यायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनासुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे गावातच काढण्याची सोय उपलब्ध झाल्याचे लीड बँक मॅनेजर वैभव लहाने यांनी सांगितले.
अडचणीच्या काळात मिळाला आधार
कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली असताना ग्रामीण भागातील बँक मित्रांच्या मदतीमुळे जवळपास 250 सखींना रोजगार मिळाला आहे. या सोबतच गावातील व्यवहारावर सुरू राहण्यास मदत मिळाली आहे. आधारकार्डवर अंगठा लावून पैसे मिळाल्याने अडचण दूर होण्यास मदत झाली. बँक मित्रालाही कमिशन पोटी मिळणाऱ्या पैशाने महिन्याला 4 ते 5 हजार रुपये मिळकतीने कुटुंबाला आधार देता आला आहे.