वर्धा -काचीगुडा एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाने सेवाग्राम स्टेशनवर बाळाला जन्म दिला. फैजीन बानो असे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रसूतीनंतर बाळ आणि आईची प्रकृती ठिक असून महिलेला वेळेवर उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि आरपीएफचे कौतुक केले जात आहे.
वर्ध्यात सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर महिलेने दिला बाळाला जन्म; वेळेत उपचार मिळाल्याने आईसह बाळ सुखरुप - सेवाग्राम रेल्वे स्टेशन
काचीगुडा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेने सेवाग्राम स्टेशनवर बाळाला जन्म दिला.
डीएससीआर एनजीपीकडून प्राप्त झालेल्या संदेशात ट्रेन क्रमांक ०४१५६ काचीगुडा एक्सप्रेसमध्ये गर्भवती महिलेच्या पोटात दुखायला लागले. फैजीन बानोला शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेवाग्राम स्टेशनपासून काही अंतरावर कळा सुरू झाल्या. याची माहिती आरपीएफ टीमला मिळाली. त्यांनी ही महिती सेवाग्राम स्टेशनला दिली. यानंतर त्या महिलेला खाली उतरण्यासाठी सांगितले. यावेळी रेणुका श्रीवास यांनी एक्सप्रेस येणाऱ्या फलाटकडे धाव घेतली. गर्भवती महिलेला सुखरूप उतरवले. प्रतीक्षा कक्षात डॉ. ज्योती यांना पाचारण करत महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरुप असून पती मो. इम्तियाज यांच्याकडे त्यांना सोपवले. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर ते हैदराबादला गेले.