वर्धा- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात किसान अधिकार दिवस म्हणून सत्याग्रह आंदोलन होणार आहे. 31 ऑक्टोबरला वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वर्ध्यात प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
सत्याग्रह बापूंच्या आश्रमासमोर असल्याने त्यास विशेष महत्व असणार आहे. या आंदोलनाचे नेतृत स्वतः प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील, विदर्भातील मंत्री नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यासह जिल्ह्यातील माजी राज्य मंत्री आमदार रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे यासह आणखी पदाधिकारी उपास्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.