वर्धा - 'पेट्रोल के दाम कम हुये की नही हुये' या पंतप्रधानाच्या जुन्या भाषणाच्या क्लिपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. हीच क्लिप वाजवत कारंजा तालुक्यात युवक काँग्रेसच्यावतीने इंधन आणि महागाईच्या विरोधात सायकल यात्रा काढली होती. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात कारंजा ते आर्वी अशी 45 किलोमीटरची ही सायकल यात्रा शुक्रवारी काढण्यात आली.
वर्ध्यात युवक काँग्रेसची सायकल यात्रा जनतेचा असंतोष दिल्ली सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी -
गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या डिझेल गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबत अन्नधान्य, खाद्यतेल यांच्याही किमतीत वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. हा असंतोष दिल्लीतील सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. शेतकरी विरोधी कायदे, सामान्य नागरिकांच्या विरोधात असलेले हे धोरण असो की बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नावाने झालेली फसवणूक या सगळ्याचा निषेध करण्याचे काम राज्य आणि देशभरात युवक कॉंग्रेस करत आहे, असे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी सांगितले.
वर्ध्यात युवक काँग्रेसची इंधन दरवाढी विरोधात सायकल यात्रा जुन्या आश्वासनाची लोकांना करून दिली आठवण -
यावेळी या सायकल यात्रेत मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सहभागी झाले होते. युवकाचा आक्रोश या आंदोलनातून दिसून आला. शेकडोच्या संख्येने युवकानी सायकल घेत या यात्रेत सहभाग घेतला. यावेळी मोदी सरकाराच्या आश्वासनांचे ऑडिओ क्लिप वाजवत जुने आश्वासन लोकांना आठवण करुन देताना लोकांचा केलेला भ्रमनिरास मांडण्याचे काम सायकल यात्रेतून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.