वर्धा - उत्तर प्रदेशाच्या हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी वर्ध्यात काँग्रेसतर्फे दोन आंदोलने करण्यात आली. काँग्रेसच्या एका गटाने महाविकास आघाडीच्या बॅनर खाली तर, दुसऱ्या गटाने दुपारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करत निषेध नोंदवला. यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा पुढे आली आहे.
सकाळी हाथरस घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेंडे आणि समर्थक निषेध आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यासह शिवसेनेचे राकेश मनशानी, तुषार देवढे अन्य पदाधिकारी उपास्थित होते. काँग्रेस कमिटीच्या प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेप्रमाणे हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नागपूर महानगर पालिकेचे विरोधीपक्षनेते तानाजीराव वणवे हे उपास्थित होते. तर, दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने हाथरसच्या घटनेचा निषेध करण्यात आला.