वर्धा : जिल्ह्यातील टाकरखेडा येथे असलेले संत लहानुजी महाराज संस्थान हे शासनाचे 'क' दर्जा प्राप्त मंदिर आहे. संत लहानुजी महाराजांचे वास्तव्य या गावात राहिल्याने याच ठिकाणी त्यांचे 5 एकरात प्रशस्त मंदिर उभे आहे. अमरावती नागपुर महामार्गापासुन दक्षिणेस अवघ्या काही अंतरावर हे मंदिर संस्थान आहे. राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात वर्षभर रोज सकाळी व संध्याकाळ जवळपास 500 नागरिकांना भोजन दिले जाते.
गोबरगॅसच्या माध्यमातुन स्वयंपाक :या भोजनदानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जेवण गोबरगॅसवर बनविल्या जाते. या संस्थेच्या जवळजवळ 450 गाई आहेत. याच गाईच्या शेणाचा उपयोग हा गोबरगॅसच्या माध्यमातुन स्वयंपाक बनविण्यासाठी केला जातो. याच गाईच्या गोमूत्रापासून व शेणापासून इथे गांडूळ खत, गांडूळ पाणी, गोमूत्रापासून फिनाईल, अमृतजल, दशपर्णी अर्क, निर्माल्य खत, कीटकनाशके आदी बनविल्या जाते.
युवकांसाठी सुवर्णसंधी :या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी लहान अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा पुस्तके, मोफत लॅपटॉप, कॉम्प्युटर, लायब्ररी, मोफत जेवण्याची व मोफत राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास 40 युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. आजपर्यंत 10 युवकांची विविध क्षेत्रांत शासकीय नोकरीत नियुक्ती झाली आहे.