वर्धा- टाळेबंदीमुळे देशात सर्वच प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक बाहेर राज्यात तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. इतर राज्यात जिल्ह्यात अडकून पडलेल्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी तेथील जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार केले आहे.
कोरोना संसर्गासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले. यात अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. वर्धा जिल्ह्यातही इतर राज्यतील, जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत.
बाहेर राज्यातील अडकलेल्या नागरिकांनी जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - nodal officer
टाळेबंदीमुळे इतर राज्य व जिल्ह्यातील वर्धेत अडकलेल्या नागरिकांनी व इतर राज्य व जिल्ह्यात अडकलेल्या वर्धेकरांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
प्रत्येक जिल्हा प्रशासन त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या आणि परत त्यांच्या स्वगावी जाण्यास इच्छूक नागरिकांची यादी तयार केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत. तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे आणि राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 07152- 243446 आणि अपर जिल्हाधिकारी 07152- 240914 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करून द्यावी किंवा wardhardc@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती द्यावी. तसेच ज्या जिल्ह्यातून प्रवास करावयाचा आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे परवानगी साठी अर्ज करावा. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना करावयाची प्रक्रियेबाबत त्यांना सविस्तर माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येईल.
वर्धेतून बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार तर बाहेरून वर्धेत येणाऱ्या नागरिकांसाठी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच या सर्व कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी त्यांची माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.