वर्धा- जिल्हा सतत तीन महिने कोरोनामुक्त राहिला होता. मात्र, सध्या कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णसंख्येने शंभरचा टप्पा पार केला आहे. एका दिवसासाठी जरी बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यास त्याला 14 दिवस विलगीकरणात राहावे, असा निर्णय कोरोना प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी नव्याने आदेश काढला आहे. यामुळे दुर्धर आजारांवर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींचे गृह विलगीकरण करण्यात येते. तसेच इतर जिल्ह्यात जाऊन परत येणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील व्यक्तींनीसुद्धा गृह विलगीकरणात राहण्याची पद्धत सुरु करण्यात आलीय. वैद्यकीय कारणासाठी डॉक्टरांची वेळ घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या रुग्णांना एका दिवसासाठी 14 दिवस गृह विलगीकरण करण्याची गरज नसणार आहे.
वर्धा जिल्ह्यातून नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात एका दिवसासाठी जाऊन परत येणाऱ्या नागरिकांना सुद्धा गृह विलगीकरण राहण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला. मात्र, याचा परिणाम इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांवर होत असल्याचे दिसून आल्याने थोडा बदल करण्यात आला.