वर्धा- सेवाग्राम आश्रम हे सत्य, अहिंसा, मानवता, मुक्तीचे प्रायोगिक केंद्र आहे. तसेच या आश्रमात स्वछता आणि आरोग्याच्या कामावर बापूंची खोलवर छाप असल्याचे दिसून येते. महात्मा गांधींनी याच ठिकाणाहून कृष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमला सुरुवात केली होती. तसेच स्वच्छ भारत अभियान आणि हागणदारी मुक्त भारत या अभियानासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी इंन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सविता रामनाथ कोविंद, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, संस्थेचे विश्वस्त पी.एल. तापडीया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. नितीन गणगने आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुशीला नायर यांची आठवण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू झाले. या महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल केली आहे. सत्य, अहिंसा, सेवा आणि मानवतेची शिकवण देणारी ही भूमी प्रेरणादायी आहे. या निमित्ताने १९६९ पासून सुरुवात केलेल्या संस्थेच्या संस्थापिका डॉ. सुशीला नायर यांची नि:स्वार्थ सेवा आठवण्याची इच्छा आहे. त्या कट्टर गांधीवादी, अविरत स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदर्शी वैद्यकीय चिकित्सक होत्या. त्याचबरोबर त्या गांधीजीच्या जवळच्या सहकारी होत्या. त्यांनी सेवाग्राम आश्रमात बराच वेळ घालवला. वैद्यकीय महाविद्यालयाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला. त्यासाठी मी तुम्हाला आणि संपूर्ण भारत आणि जगभरात पसरलेल्या संपूर्ण महात्मा गांधी संस्था परिवाराचे अभिनंदन करतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.