वर्धा- कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे शाळा बंद आहेत, तर काही शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश मुलं घरी मोबाईल हाताळताना दिसतात. पण मुलांकडून आरोग्य सेतू अॅपवर चूकीची माहिती भरली गेली अन् ते एका कुटुंबाला तापदायक ठरले. अॅपवर दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण कुटुंबालाच क्वारंटाइन राहावे लागले. वर्ध्याच्या आर्वीमध्ये एका कुटुंबाला या प्रकारास सामोरे जावे लागले आहे. काय घडलं वाचा...
झाले असे की, सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने मोबाईल मुलांच्या हाती असतो. सहावीच्या वर्गात असणाऱ्या एका चिमुकलीने मोठ्यांना कशाचीच कल्पनाही नसताना, आरोग्य सेतू अॅप उघडले. यावर तिने नकळत चुकीची माहिती भरली. मग काय फोन खणखणाला सुरूवात झाली. पहिला फोन आला तो जिल्हाधिकारी कार्यालयातून. त्यात त्यांना नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्यास सांगण्यात आले. दुसरा फोन आला तो आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातून, आरोग्य कर्मचाऱ्यांने केला. त्यांना आरोग्य तपासणी करून क्वारंटाइन राहावे लागेल, असे सांगितले.
त्या कुटुंब प्रमुखाला काय करावे कळेना, त्यांनी याविषयी सखोल चौकशी केली. तेव्हा कळले की, मुलांनी अॅपवर चुकीने माहिती टाकली होती. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला होता. कुठलीही लक्षण किंवा आजार नसताना नाईलाजाने त्या अख्या कुटुंबला सात दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागले. महत्वाचे म्हणजे, त्या कुटुंबांने प्रशासनाला सहकार्य करत आरोग्य तपासणी करून घेतली.
आरोग्य सेतू अॅपवर मुलानं दिली उत्तरं... अॅप वापरण्याचे आवाहन -शासनाच्या वतीने आरोग्य सेतू अॅपमधून कोविड विषयक माहिती देण्यात येते. जिल्ह्यात दीड लाखांवर लोकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. अॅपच्या माध्यमातून हाय रिस्कमध्ये असलेल्या १०७ लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे कोविडच्या काळात आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून माहिती भरा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.आता त्या कुटुंबाचा क्वारंटाइनचा कालावधी संपला आहे. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने कुटुंब ठणठणीत असताना केवळ अॅपवर चूकीने भरलेल्या माहितीमुळे अख्या कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठीही मुलांना मोबाईल देताना काळजी घेण्याची गरज आहे.
हेही वाचा -जिवंत माणसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा...वर्ध्यात 'प्रहार'चे लक्षवेधी आंदोलन
हेही वाचा -वर्ध्यात कोरोनाबाधितांची संख्या 34 वर, शहरासह 9 ग्रामपंचायतीत तीन दिवस संचारबंदी